शहाजी फुरडे-पाटील यांना “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 18, 2026

शहाजी फुरडे-पाटील यांना “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

 शहाजी फुरडे-पाटील यांना “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर


बार्शी (कटूसत्य वृत्त):- गेली अनेक वर्षे वारकरी संप्रदाय, पालखी सोहळे आणि भागवत धर्माचा विचार आपल्या प्रभावी लेखणीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना सन २०२६ चा प्रतिष्ठेचा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाला आहे. वारकरी परंपरेचा जिव्हाळ्याने अभ्यास करत समाजमनात भक्ती, संस्कार आणि वारीचे महत्त्व रुजविणाऱ्या फुरडे-पाटील यांच्या कार्याचा हा मानाचा गौरव मानला जात आहे.

पंढरपूर व जळगाव येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी पालखी सोहळ्यात उल्लेखनीय वार्तांकन करणाऱ्या आणि भागवत धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांना प्रदान केला जातो. संस्थेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा, शाल, श्रीफळ आणि संत मुक्ताबाई चरित्र ग्रंथ असे आहे. संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या पुरस्काराची घोषणा केली.

लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी म्हणून गेली वीस वर्षे कार्यरत असलेले शहाजी फुरडे-पाटील यांनी पत्रकारितेसोबतच वारकरी संप्रदायाशी असलेली नाळ अखंड जपली आहे. बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथील रहिवासी असलेल्या फुरडे-पाटील यांनी मागील तब्बल १८ वर्षांपासून पालखी मार्गावरील वारीचे सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वार्तांकन केले आहे. त्यांच्या लेखणीतून केवळ वारीतील भक्तिभावच नव्हे, तर वारकऱ्यांच्या अडचणी, सामाजिक प्रश्न, धार्मिक परंपरा आणि मूलभूत सुविधांचे प्रश्नही प्रभावीपणे मांडले गेले.

आषाढी वारीदरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज तसेच आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्यांवरील त्यांचे लेखन विशेष गाजले आहे. इंदापूर ते पंढरपूर, फलटण ते पंढरपूर तसेच मुक्ताई सोहळ्याच्या वारी मार्गावरील विविध विषयांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली. आषाढी एकादशी सोहळा, महापूजा आणि पंढरपूर शहरातील धार्मिक वातावरणाचे त्यांनी केलेले जिवंत वार्तांकन वारकरी वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे.

सन २००८ मध्ये लोकमतचे तत्कालीन संपादक सुधीर महाजन आणि पंढरपूर कार्यालय प्रमुख प्रताप नलावडे यांनी त्यांना वारी वार्तांकनाची संधी दिली. पहिल्याच वर्षी माऊली पालखी सोहळ्यावर विविध अंगांनी केलेल्या लेखनामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. वारकरी पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, विलास काटे, राजेंद्रकृष्ण कापसे, राजाभाऊ चोपदार आणि पुंडलिक मोरे महाराज यांचे त्यांना लाभलेले मार्गदर्शन त्यांच्या पत्रकारितेला अधिक समृद्ध करणारे ठरले.

भगवंत मंदिरात श्रावण महिन्यात आयोजित जयवंत बोधले महाराजांच्या प्रवचनमालेवर “बोधवाणी” या सदरातून सलग पाच वर्षे त्यांनी लेखन केले आहे. तसेच पंढरपूर ते मुक्ताईनगर जाणाऱ्या पांडुरंगराय पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात बार्शीतील विसाव्याचे नियोजन आणि वारकरी सेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

यापूर्वी हा मानाचा पुरस्कार सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, मनोज मांढरे, राजेंद्रकृष्ण कापसे आणि सुनील लांडगे यांना प्रदान करण्यात आला आहे. यंदा शहाजी फुरडे-पाटील यांच्या रूपाने वारकरी पत्रकारितेतील समर्पित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा गौरव होत असल्याची भावना वारकरी व पत्रकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई मठात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages