'नीट'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशभरातील वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची मानली जाणारी पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे झालेली नीटची परीक्षा रद्द करण्यात आल्याने सोलापूरसह मोहोळ ग्रामीणमधील विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र सरकार व संबंधित परीक्षा यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याची तीव्र प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्व मोठ्या तयारीने नीटची परीक्षा दिली होती. आपले स्वप्न पूर्ण होणार, अशी आशा सर्वांना होती. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासात काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गोरगरीब, सामान्य शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या लाखो गुणवंत विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्षभर कठोर मेहनत करूनही काही मोजक्या गैरप्रकार करणाऱ्यांमुळे संपूर्ण परीक्षा रद्द होणे अन्यायकारक आहे, अशी भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे. असे प्रकार वारंवार घडत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
परीक्षा रद्द झाल्यामुळे पुढील वेळापत्रक, प्रवेश प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन यावर मोठा परिणाम होणार आहे. नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांवर अतिरिक्त मानसिक व शैक्षणिक ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालकांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.

No comments:
Post a Comment