राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 15, 2026

राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत

 राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याच्या परिवहन विभागाने ९ मार्च २०२६ पासून नवीन ऑटोरिक्षांचे खुले परमीट बंद केले. दुसरीकडे, नवीन इलेक्ट्रिक रिक्षांच्या नोंदणीवर कोणतेही निर्बंध नाहीत. इलेक्ट्रिक रिक्षा घेणाऱ्याकडे लायसन्स, प्रवासी वाहतुकीचा बॅच आणि पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

त्यासोबत वितरक किंवा परवानाधारक ड्रायव्हिंग स्कूलकडून १० दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र देखील बंधनकारक आहे.

सोलापूर व अकलूज आरटीओ शाखेकडील नोंदीनुसार सोलापूर जिल्ह्यात ४० हजारांपर्यंत रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. तरीसुद्धा, दरमहा सोलापूर जिल्ह्यात विशेषत: शहरात सरासरी ५० रिक्षा वाढत होत्या. वाढत्या रिक्षांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत होत्या. या पार्श्वभूमीवर ९ मार्चपासून ऑटोरिक्षांचे खुले परमीट बंद करण्यात आले. तत्पूर्वी, ज्यांनी नवीन रिक्षा खरेदीसाठी इरादा पत्र केले आहे, त्यांना १८० दिवसांच्या मुदतीत परमीटसह नवीन रिक्षा घेता येईल.

आता ऑटोरिक्षा व इलेक्ट्रिक रिक्षांसाठी एकच नियमावली असावी म्हणून इलेक्ट्रिक रिक्षासाठी देखील 'आरटीओ'चा परवाना बंधनकारक केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भातील शासन आदेश अजून निघालेला नाही. तूर्तास, १३ मार्च २०२६ रोजी 'परिवहन'ने काढलेल्या पत्रानुसार इलेक्ट्रिक रिक्षा घेणाऱ्याकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन त्यांना परवाना दिला जात आहे.

१० हजारांचे जुने परमीट एक लाखाला

राज्य सरकारने ९ मार्च २०२६ पासून नवीन ऑटोरिक्षांचे खुले परमीट देण्यास तात्पुरती स्थगिती दिली. सोलापूर शहर-जिल्ह्यात दरमहा ७२ ते ८० रिक्षा वाढत होत्या. परंतु, परमीट बंदमुळे रिक्षांची नोंदणी थांबली आहे. आता जुन्या रिक्षावाल्यांकडून परमीट विकत घेऊन नवीन रिक्षांवर चढविण्याचे प्रमाण वाढत आहे. नवीन परमीटसाठी परिवहन विभागाचे १० हजार रुपयांचे शुल्क होते, पण परमीट बंद झाल्याने नवीन रिक्षावाले जुन्या रिक्षा चालकांकडील परमीट विकत घेत आहेत. त्यासाठी ७५ हजार ते एक लाख रुपये मोजत आहेत. ज्या परिसरातील रिक्षाचे परमीट विकत घेतले, त्याच तालुक्यात, जिल्ह्यातील नवीन रिक्षावर ते चढविता येते, असा नियम आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages