भोंदूगिरीला प्रशासनाचे संरक्षण? आडम मास्तरांचा गंभीर आरोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 4, 2026

भोंदूगिरीला प्रशासनाचे संरक्षण? आडम मास्तरांचा गंभीर आरोप

 भोंदूगिरीला प्रशासनाचे संरक्षण? आडम मास्तरांचा गंभीर आरोप




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राज्यात बुवाबाजी वाढीस लागली असून काही प्रकरणांमध्ये सरकारकडूनच अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात असल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी असून, अशोक खरात प्रकरणात प्रशासनाची भूमिका समाधानकारक नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून भोंदूगिरीला खतपाणी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने आयोजित ‘फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद’ रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) सभागृहात पार पडली. या परिषदेत आडम मास्तर उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमास ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज प्रमुख पाहुणे, तर अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मराज चवरे, रमेश खाडे, सुधाकर काशिद, ॲड. गोविंद पाटील आदींसह अंनिसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेत विविध सत्रांमधून अंधश्रद्धा व बुवाबाजीविरोधात प्रबोधन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात “फलज्योतिष : समज आणि वास्तव” या विषयावर डॉ. नितीन शिंदे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली. या सत्राचे अध्यक्ष दत्ता चांदणे होते, तर डॉ. सचिन जम्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तिसऱ्या सत्रात “राजकारण आणि बुवाबाजी” या विषयावर ह.भ.प. नितीन परभणीकर यांनी भाष्य करत समाजाने सजग राहण्याचे आवाहन केले. या सत्राचे अध्यक्षपद रवींद्र चिंचोळकर यांनी भूषविले.

समारोप सत्रात प्रा. एम. आर. कांबळे अध्यक्षस्थानी होते. नंदकुमार फाटे, रवींद्र मोकाशी आणि प्रा. प्रदीप जगताप यांनी मार्गदर्शन करत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages