न्यायालयात कोयता घेऊन आलेल्या तिघांवर गुन्हा; एक संशयित फरार
पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असलेल्या आरोपी गोपाळ अंकुशराव याला न्यायालयात हजर करण्यात आले असताना त्याला भेटण्यासाठी आलेल्या तीन तरुणांकडे कोयता आढळून आल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी इसबावी येथील मारुती बाळू कोळी, रितेश धनंजय गोडसे आणि तेजस नागनाथ कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तेजस कांबळे हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोपाळ अंकुशराव याच्यावर खूनासह विविध गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटकातील एका प्रकरणात त्याला पंढरपूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला भेटण्यासाठी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
न्यायालय परिसरात बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना एक विनाक्रमांकाची चारचाकी संशयास्पद अवस्थेत आढळली. वाहनाची तपासणी केली असता पुढील सीटखाली प्राणघातक लोखंडी कोयता सापडला. वाहनाच्या मागील बाजूस एमएच १३ डीटी ७५४६ असा क्रमांक आढळून आला.
पोलिसांनी संबंधित तरुणांकडे वाहनात कोयता ठेवण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे न्यायालय परिसरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment