ठराव झालेल्या घरपट्टीवरील व्याजमाफीची अंमलबजावणी कधी? पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करा
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा शहरातील घरपट्टीवरील व्याजात सूट देण्याबाबत नगरपालिकेच्या सर्वपक्षीय सदस्यांच्या सहमतीने ठराव मंजूर होऊन अनेक महिने उलटले तरी अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यामुळे शहरातील मालमत्ताधारकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. नगरसेवकांनी प्रशासनावर ढिसाळ कारभाराचा आरोप करत, “ठराव मंजूर झाल्यानंतरही तो राबवला जात नसल्याने नागरिकांना अनावश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे,” अशी भूमिका मांडली.
नगरपालिकेच्या बैठकीत मंजूर झालेल्या या निर्णयामुळे शहरातील अनेक थकीत घरपट्टीधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. विरोधी पक्षाने प्रशासनाला जाब विचारत “ठराव मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी न करणे म्हणजे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे,” असा आरोप केला.
यासोबतच शहरातील विविध भागातील नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची मागणीही करण्यात आली. पावसाळा तोंडावर आला असताना अनेक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, काही ठिकाणी ठेकेदारांना कामे देण्यात आली असतानाही प्रत्यक्षात साफसफाई झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, दुर्गंधी, डासांची वाढ तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
“कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे आणि पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईची कामे पूर्ण करावीत,” असा इशारा विरोधी पक्षाच्या वतीने देण्यात आला. प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
या वेळी नगरसेवक युवराज चिवटे, नगरसेविका अश्विनी कांबळे-अब्दुले, नगरसेविका सुवर्णा आलाट तसेच नगरसेविका सोफिया कुरेशी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment