नवीन मिळकती शोधण्यात निष्काळजीपणा महागात; ३५ हजार ५०० रुपयांचा दंड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नवीन मिळकतींचा शोध घेऊन मालमत्ता कर आकारणी करण्याच्या मोहिमेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील १९ कर निरीक्षकांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांकडून एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका उपायुक्त साेनाली यादव यांनी जारी केले आहेत.
महापालिका प्रशासनाने ८ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन मिळकतींचा शोध घेणे तसेच अपार्टमेंटमधील शिल्लक फ्लॅट आणि गाळ्यांची दररोज किमान पाच मिळकतींची कर आकारणी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबवून नवीन मिळकती करजाळ्यात आणण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र,15 मेपर्यंतच्या सर्वेक्षण आणि आकारणी अहवालाचा आढावा घेतल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे स्पष्ट झाले. वारंवार सूचना आणि आदेश देऊनही संबंधितांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
या निष्काळजीपणाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तरीही समाधानकारक कामगिरी न झाल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६(२)(ड) अंतर्गत आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment