“पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी”: अरुण कृष्णमूर्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 19, 2026

“पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी”: अरुण कृष्णमूर्ती

 “पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी”: अरुण कृष्णमूर्ती

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजच्या पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता, शाश्वत विकासाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने एमआयटी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्यावतीने प्रख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ते अरुण कृष्णमूर्ती यांच्याशी विशेष संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. देशभरातील तलाव, नद्या आणि विविध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एन्व्हार्नमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया (Environmentalist Foundation of India - EFI) चे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती यांनी आपल्या प्रभावी संवादातून युवकांमध्ये पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव जागृत केली. पर्यावरणीय संकटांची गंभीरता अधोरेखित करत त्यांनी शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि सामूहिक कृतीचे महत्त्व विशद करताना पर्यावरण संवर्धनासाठी केवळ जागरूक न राहता प्रत्यक्ष कृतीशील होण्याचा संदेश दिला.
   कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वशांती प्रार्थनेने झाली. त्यानंतर अरुण कृष्णमूर्ती यांच्या पर्यावरणीय कार्यप्रवासावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. तलाव पुनरुज्जीवन मोहिमा, समुदाय सहभाग, पर्यावरण संवर्धनासाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांच्या उपक्रमांचा समाजावर झालेला सकारात्मक परिणाम यांचे प्रभावी दर्शन यामधून घडविण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी, “पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकार किंवा संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.” असे विचार मांडले.  युवक हे अशा सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी वाहक ठरू शकतात, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
यानंतर आयोजित संवाद सत्रात प्रा. अमिताभा घोष यांनी पर्यावरण संवर्धन, नेतृत्व व समुदाय सहभाग, जलस्रोत पुनरुज्जीवन आणि शाश्वत विकास यांसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या वतीनेही उत्स्फूर्त प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना अरुण कृष्णमूर्ती यांनी देशाच्या विविध भागांत काम करताना आलेली अनुभव, आव्हाने आणि यशस्वी पर्यावरणीय उपक्रमांची उदाहरणे मांडली. पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत प्रत्येक व्यक्तीने छोट्या कृतींमधूनही मोठा बदल घडवू शकतो, हा आशावादी संदेश त्यांनी दिला.
समारोपप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपालकृष्ण जोशी यांनी सामाजिकदृष्ट्या जबाबदार व संवेदनशील नेतृत्व घडविण्यासाठी अशा संवादमाला आणि उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले “एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ हे आजच्या तरुण पिढीला पर्यावरणीय जबाबदारी आणि शाश्वत विकासाच्या दिशेने जागरूक करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्षात काम करणारे अरुण कृष्णमूर्ती सारखे आदर्श व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना कृतीशील आणि पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेत सक्रिय होण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील.” असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल दमजी आणि गायत्री गायकवाड यांनी केले. या चर्चासत्रास विद्यार्थी, प्राध्यापक आणि विशेष निमंत्रितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages