मराठी आणि तेलुगू संस्कृतीला जोडणारा 'मराठीतून तेलुगू शिका' उपक्रम सोलापुरात यशस्वी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाषेच्या भिंती ओलांडून दोन संस्कृतींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि हृदय स्पर्श बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठीतून शिका तेलुगू लिहायला आणि वाचायला' या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा सांगता व प्रमाणपत्र वाटप सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष देविदास गोटीपामूल, प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. माणिक अंबाजी गुर्रम, तर विशेष अतिथी म्हणून 'आधुनिक सारथी'चे संपादक श्रीनिवास बुरा तसेच वाचनालयाचे संचालक अशोक इंदापुरे आणि अरविंद चिन्नी यांची उपस्थिती होती.
डॉ. माणिक गुर्रम यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, "सोलापूर हे बहुभाषिक शहर असून अशा उपक्रमांमुळे समाजा-समाजातील संवाद वाढतो. भाषेचे ज्ञान हे केवळ संवादासाठी नाही, तर मनांना जोडण्यासाठी आवश्यक आहे." श्रीनिवास बुरा यांनी बदलत्या काळात दोन भाषांचे ज्ञान असणे हे प्रगतीसाठी कसे महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. अशोक इंदापुरे यांनी दोन्ही संस्थांच्या वतीने घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, "वाचनालय आणि हृदय स्पर्श संस्थेने घेतलेल्या मेहनतीमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला असून, सोलापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्यासाठी हा एक मैलाचा दगड ठरेल."
या उपक्रमाचे मुख्य प्रशिक्षक काशिनाथ गंजी (सचिव, हृदय स्पर्श संस्था) यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या शैलीतून विद्यार्थ्यांना अत्यंत रंजक पद्धतीने तेलुगू भाषेची ओळख करून दिली. तर सहाय्यक शिक्षक आणि डाक विभागाचे कर्मचारी श्रीरंग रेगोटी यांनी तयार केलेल्या सोप्या 'स्टडी नोट्स' आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घेतलेला नियमित होमवर्क यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना तेलुगू भाषा आत्मसात करणे सहज शक्य झाले.
या सोहळ्यात प्रशिक्षणार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना गोपीकृष्ण वड्डेपल्लीआणि बाबुराव म्हेत्रे यांनी म्हणाले की, प्रशिक्षक काशिनाथ गंजी आणि श्रीरंग रेगोटी सरांनी वर्गात शिकवताना जे बारकावे सांगितले, त्यामुळे तेलुगू सारखी समृद्ध भाषा शिकणे खूप सोपे झाले. विशेषतः अवघड जोडाक्षरे आणि उच्चार शास्त्र त्यांनी ज्या पद्धतीने समजावून सांगितले, ते कौतुकास्पद आहे. नोकरी-व्यवसाय सांभाळूनही केवळ या सुटसुटीत नियोजनामुळेच आम्हाला ही भाषा आत्मसात करता आली." महिला प्रशिक्षणार्थी सौ. सुजाता चिप्पा आणि सौ. अंजली शिरसी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "रेगोटी सरांनी बनवलेल्या सुटसुटीत नोट्स आणि नियमित डिजिटल होमवर्कमुळे घरबसल्या सराव करणे सोपे झाले. यामुळे आमचा दुसरी भाषा शिकण्याचा आत्मविश्वास वाढला आहे." तसेच अनेक प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करताना, अवघ्या काही दिवसांत आम्हाला तेलुगू लिहिता आणि वाचता येऊ लागल्याचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गौरीशंकर दिकोंडा यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ. अंजली शिरसी यांच्या वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकारी मंडळ आणि हृदय स्पर्श संस्थेच्या अध्यक्षा सौ नर्मदा गंजी, श्रीनिवास वंगारी, उमेश नक्का, सिद्धलिंगेश्वर विजापूरे, हरिदास पेंटा, सौ रमा इप्पनपल्ली यांनी परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सोलापूरच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून मोठे कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment