नागेश म्हेत्रे मित्र परिवारातर्फे नूतन खासदार, नगरसेवक व गुणवंतांचा भव्य सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागेश म्हेत्रे मित्र परिवाराच्या वतीने मोची समाजातील नूतन खासदार, नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ शनिवार, दि. 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता मोदी येथील अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पद्माकर देव सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या कार्यक्रमात मोची समाजातून खासदार म्हणून निवड झालेल्या प्रा. डॉ. सौ. ज्योतीताई वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाजातील नूतन नगरसेवक प्रा. नरसिंग आसादे, मधुसुदन जंगम, सौ. निर्मला जंगम, स्वीकृत नगरसेवक ऋषिकेश मेट्रे तसेच नूतन रेल्वे बोर्ड सदस्य दिनेश म्हेत्रे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात समाजातील विविध शासकीय व निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असून, इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही या निमित्ताने सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, मोची समाज शहराध्यक्ष सैदप्पा जंगडेकर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले करिअर मार्गदर्शन सत्र. ‘10 वी-12 वी नंतर काय?’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ड्रिम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांचे विशेष मार्गदर्शन व व्याख्यान होणार आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यातील शिक्षण, करिअरच्या संधी, विविध अभ्यासक्रमांची माहिती आणि योग्य दिशा याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी या सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्कारासाठी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले असून यासाठी 9307110081 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजातील नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि युवकांना करिअरविषयक मार्गदर्शन अशा त्रिसूत्री उपक्रमामुळे हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेस नागेश म्हेत्रे, काशीनाथ भतगुणकी, रविकांत मस्के, मारुती पवार, एजाज शेख, सर्फराज नदाफ आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment