यात्रेत चोरी करणारी महिला जेरबंद; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, ही महिला लहान मुलाला काखेत घेऊन गर्दीतून नजर चुकवत महिलांच्या गळ्यातील व पर्समधील दागिने चोरत होती. या प्रकरणासह आणखी एका चोरीच्या गुन्ह्यातील महिलेलाही पोलिसांनी जेरबंद करत एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पहिल्या घटनेत, गड्डा यात्रेदरम्यान निता काळे (वय ४५, रा. शिरापूर रोड, लोकमंगल कारखान्याजवळ, ता. मोहोळ) हिने सुमारे साडेनऊ ग्रॅमचे चांदीचे ब्रेसलेट व सहा हजार रुपयांची रोकड चोरल्याचे उघड झाले. तिच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. २६ एप्रिल रोजी शहर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली देत चोरलेले दागिने व रोकड पोलिसांकडे सुपूर्द केली.
दुसऱ्या घटनेत, जवळच्या नात्यातील जलकर कुटुंबीयांच्या घरी विवाह सोहळ्यासाठी आलेल्या एका महिलेने घरातील महिलेचे अंदाजे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले. संबंधित महिलेने झोपताना दागिने उशीखाली ठेवले होते. मात्र, शेजारी झोपलेल्या नात्यातील महिलेने पहाटेच दागिन्यांची पर्स घेऊन पळ काढला. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
शहर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. मोनिका रोहिटे (रा. लहान थोबडे वस्ती, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, मछिंद्र पंडित (सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने तसेच महिला अंमलदार सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी, चालक बाळू काळे व सतीश काटे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
.jpg)
No comments:
Post a Comment