सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुळे सोलापूर परिसरातील डी-मार्ट ते विजापूर हायवे दरम्यान झालेल्या रस्ता डांबरीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका श्रद्धा पवार यांनी महापालिका सभागृहाबाहेर चिमुकलीसह उपोषण सुरू केले आहे.
सदर रस्त्याच्या कामासाठी सुमारे ३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र हे काम नेमके कोणत्या योजनेतून मंजूर झाले, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचे इस्टिमेट तयार करून ठेकेदारास लाभ मिळवून दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
श्रद्धा पवार यांनी सांगितले की, जर हे काम राष्ट्रीय धुळमुक्त योजनेतून मंजूर झाले असेल, तर इस्टिमेटमध्ये मोठ्या त्रुटी असतानाही त्यास तांत्रिक मंजुरी कशी देण्यात आली, याची सखोल चौकशी व्हावी. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, महापौर विनायक कोंडयाल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
No comments:
Post a Comment