२७० परिचारिका संपात; रुग्णालयात सेवांवर ताण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विविध प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिकांनी मंगळवारी बेमुदत संपात सहभागी होत आंदोलन छेडले. सुमारे २७० परिचारिकांनी या संपात सहभाग घेतला असून रुग्णालयातील सेवांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
मंगळवारी सकाळी रुग्णालयाच्या बी ब्लॉकसमोर सर्व परिचारिका एकत्र येऊन त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाला लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवला. त्यानंतर परिचारिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात सहभागी झाल्या.
या आंदोलनात जुनी पेन्शन योजना लागू करणे, सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची अधिसूचना तातडीने जारी करणे, चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहनचालक भरतीवरील बंदी उठवणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, तसेच कंत्राटी व अंशकालीन कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी विमा योजना लागू करावी, पीएफआरडीए कायद्याबाबत निर्णय घ्यावा आणि रिक्त पदे तातडीने भरावीत, अशाही मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, सोलापूर शाखेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असला तरी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या परिचारिका काळ्या फिती लावून काम करत आहेत. शासनाने दोन दिवसांत मागण्या मान्य न केल्यास २४ एप्रिलपासून बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment