सोलापूर @ ४३.९०; उष्णतेचा कडाका, अतिनील निर्देशांक १० च्या पुढे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात उष्णतेचा कहर वाढला असून सोमवारी कमाल तापमान ४३.९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. दिवसभर कडक उन्हाच्या झळा जाणवत होत्या. यापूर्वीही सोलापूरचे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेलेले असले तरी, सध्या पुन्हा तापमानात वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
यासोबतच सोलापूरचा अतिनील (UV) निर्देशांक १० च्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. तज्ञांच्या मते, अशा स्थितीत सूर्याच्या अतिनील किरणांचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ या किरणांच्या संपर्कात राहिल्यास सनबर्न, त्वचेचे अकाली वृद्धत्व, डीएनए नुकसान, मोतीबिंदू तसेच त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
अतिनील निर्देशांक हा विशिष्ट वेळ आणि ठिकाणी सूर्यापासून येणाऱ्या किरणोत्सर्गाची तीव्रता दर्शवतो. निर्देशांक ० ते २ दरम्यान असल्यास धोका कमी असतो, ३ ते ५ दरम्यान मध्यम धोका निर्माण होतो, तर ६ ते ७ दरम्यान त्वचा व डोळ्यांना हानी पोहोचण्याचा धोका वाढतो. मात्र, १० च्या पुढील निर्देशांक हा अत्यंत धोकादायक मानला जातो.
दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, डोके व शरीर झाकणारे कपडे वापरावेत, सनस्क्रीनचा वापर करावा तसेच पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे, असे आवाहन प्रशासन आणि तज्ञांकडून करण्यात आले आहे.
.png)
No comments:
Post a Comment