आसरा रेल्वे ब्रीजसाठी अडथळा ठरणाऱ्या तीन इमारतींचे बांधकाम निष्कासीत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अरुंद पडत असलेल्या आसरा रेल्वे ब्रीजच्या रुंदीकरणासाठी अखेर महापालिका प्रशासनाने ठोस पाऊल उचलत पुलालगत असलेल्या तीन इमारतींचे बांधकाम सोमवारी निष्कासीत केले. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई केली.
होटगी रोड ते आसरा मार्गे जुळे सोलापुरात येणाऱ्या वाहनधारकांसाठी हा रेल्वे पूल अपुरा ठरत होता. पुलाच्या अरुंदतेमुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे नागरिक, विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने पुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे.
दरम्यान, पुलाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या बांधकामांबाबत रेल्वे विभागाने महापालिकेला दोनवेळा पत्र पाठवले होते. त्यानुसार नगररचना विभागाने संबंधित इमारतधारकांना नोटिसा देऊन अंतिम सूचना दिली होती. काही बांधकामे यापूर्वीच निष्कासीत करण्यात आली होती; मात्र उर्वरित तीन इमारती हटविल्या गेल्या नव्हत्या.
सोमवारी सकाळी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने पोलीस बंदोबस्तात नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई सुरू केली. नगररचना विभागाने केलेल्या मार्किंगनुसार या तीनही इमारतींचे संपूर्ण बांधकाम दुपारपर्यंत पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान नियंत्रण अधिकारी स्वतः उपस्थित राहून पथकाला मार्गदर्शन करत होते. अधिकारी जगन्नाथ बनसोडे, दीपक कुंभार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पूर्ण केली.
या कारवाईनंतर आसरा रेल्वे ब्रीजच्या उभारणीसाठीचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला वेग येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment