वैशाली मेडिसिंगपाटील यांच्या 'हितगुज मनाशी' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
माढा (कटूसत्य वृत्त):- वेल्वेट प्रकाशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्या वतीने एकाच वेळी विविध प्रकारची 50 पुस्तके प्रकाशित करुन जागतिक विक्रमाची नोंद करण्यात आली.या सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील देवडी येथील कवयित्री वैशाली रोहित मेडसिंगपाटील यांच्या 'हितगुज मनाशी' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवयित्री रोहिणी निनावे यांच्या हस्ते व समीक्षक सौमित्र पोटे आणि गायिका मंजुश्री ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आले.
या विक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.यावेळी 9 ते 80 वर्षे वयोगटातील साहित्यिकांचे कथासंग्रह,काव्यसंग्रह,कादंबरी विनोदी कथासंग्रह,चारोळी संग्रह,बालकथा संग्रह आदींचे मोठ्या दिमागदार सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले.
नवोदित कवयित्री वैशाली मेडसिंगपाटील मागील 20 वर्षांपासून मुंबई व पुण्यासह विविध ठिकाणी आयटीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांना लहानपणापासूनच मराठी विषयातील गोष्टी, कविता कथा वाचायची,ऐकायची आणि सांगायची आवड असल्याने त्यांनी जिद्द,चिकाटी, वडीलधाऱ्यांची प्रेरणा व मार्गदर्शन आणि मोठ्या परिश्रमातून 'हितगुज मनाशी' हा 57 कवितांचा काव्यसंग्रह तयार करून तो प्रकाशित केला आहे.जीवन जगताना फक्त नोकरी करून पैसा कमावणे हेच अंतिम ध्येय नव्हे तर जीवनात आनंद,समाधान, आरोग्य मिळवण्यासाठी काही चांगले छंद जोपासणे आवश्यक असते.हाच विधायक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मी,श्रद्धास्थानं,नाती व आशेच्या वाटेवर या चार विभागांत कवितांचा रचना केली आहे.या कवितांचा आशय वाचक व विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.हितगुज मनाशी हा काव्यसंग्रह म्हणजे आत्मशोध,संवेदना आणि स्त्री मनाच्या सूक्ष्म भावविश्वाचा प्रामाणिक दस्तऐवज आहे.घर- जबाबदाऱ्या,नात्यांची गुंतागुंत आणि अंतर्मनातील संवाद या सर्वांचा सुरेख संगम आहे. साध्या,सहजसुलभ व ओघवत्या भाषेत या कविता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीच्या भूमिकांमधील संघर्ष, अपेक्षा आणि स्वतःला शोधण्याची जिद्द,निसर्ग, आठवणी आणि नात्यांची उब यामधून हा कवितासंग्रह वाचकाला नक्कीच अंतर्मुख करायला लावेल अशी हरहुन्नरी कवयित्री वैशाली मेडसिंगपाटील यांची अपेक्षा आहे.
यावेळी संस्थापक वर्षा ठुकरुल,सिंधू बागवे,अशोक आदक,मृणाल घोंगडे,रामचंद्र घोंगाणे,वत्सला घोंगाणे, इंजिनिअर रोहित मेडसिंगपाटील,रवींद्र घोंगाणे,वैशाली घोंगाणे यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment