जिल्हा युवा पुरस्कार सन २०२५–२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 7, 2026

जिल्हा युवा पुरस्कार सन २०२५–२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कार सन २०२५–२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राष्ट्र व राज्याच्या उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समाजातील विविध क्षेत्रात अनेक युवक व युवा संस्था उल्लेखनीय कार्य करीत आहेत. युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे व त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने राज्य शासनाच्या युवा धोरणांतर्गत शासन निर्णय दि. १२ जानेवारी २०१३ नुसार राज्य व जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
सन २०२५–२६ या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातील समाजोपयोगी कार्य करणाऱ्या युवकांचा गौरव व्हावा या हेतूने जिल्हास्तरावर १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप व्यक्तींसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 10 हजार तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये ५० हजार असे आहे.
या पुरस्कारासाठी अर्जदारांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेले योगदान, अनुसूचित जाती-जमाती व आदिवासी विकास, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार निर्मिती, आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, नागरी वस्ती सुधारणा, झोपडपट्टी विकास, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्यांवर केलेले कार्य यांचा विचार करण्यात येणार आहे.

अर्जदारांच्या दि. ०१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील मागील तीन वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल. इच्छुक युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. १७ एप्रिल, २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
जास्तीत जास्त पात्र युवक, युवती व संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages