भोंदू अशोक खरात याच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी देऊन केले दहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 8, 2026

भोंदू अशोक खरात याच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी देऊन केले दहन

 भोंदू अशोक खरात याच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी देऊन केले दहन


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि बुवाबाजीच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने आज तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुख्यात भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापूर येथे त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले.

ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) आणि जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पूनम गेट येथे हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सांगितले की, राज्यात तंत्र-मंत्र, अंगारे-धुपारे यांच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. अशोक खरात याच्या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंत्री सामील असल्याचे समोर येत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. संविधानाने अपेक्षित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष कॉ. नसीमा शेख यांनी सांगितले की, अशोक खरातसारखे अनेक भोंदू बाबा राज्यातील गावागावांत व शहरांमध्ये कार्यरत असून, ते भोळ्या-भाबड्या नागरिकांचे विविध प्रकारे शोषण करत आहेत.

माकपच्या राज्य कमिटी सदस्य तथा माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांनीही या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशोक खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरण्यात यावी, तसेच या प्रकरणात सामील असलेल्या ३९ आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असून, ते तातडीने हटवावेत, अशीही मागणी करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, लिंगाव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, अफसाना बेग आदींचा समावेश होता.

यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख यांनी सांगितले की, पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धेची गरज नसून विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. समाजात आजही अनेक ‘अशोक खरात’ अस्तित्वात असून, त्यांना संपवण्यासाठी विवेकवाद हा एकमेव पर्याय आहे.

या आंदोलनाच्या यशस्वी करण्यासाठी राज्य समिती सदस्य दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख,ॲड. अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, हनिफ सारखेड, फातिमा बेग,विल्यम ससाणे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अकील शेख,वीरेंद्र पद्मा,बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बापू साबळे, रफिक काझी, बालाजी तुम्मा ,सनी शेट्टी, बजरंग गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages