चूल पेटली आंदोलनासाठी” गॅस तुटवड्याविरोधात महिलांचा जिल्हा परिषदेसमोर एल्गार! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 10, 2026

चूल पेटली आंदोलनासाठी” गॅस तुटवड्याविरोधात महिलांचा जिल्हा परिषदेसमोर एल्गार!

 चूल पेटली आंदोलनासाठी”  गॅस तुटवड्याविरोधात महिलांचा जिल्हा परिषदेसमोर एल्गार!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने 8 एप्रिल रोजी जिल्हा परिषद पुनम गेट येथे अनोखे व लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉ. नसीमा शेख व जिल्हा अध्यक्षा शकुंतला पाणीभाते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

या आंदोलनात महिलांनी प्रत्यक्ष चूल पेटवून स्वयंपाक करत आणि त्याच ठिकाणी जेवण करून सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. “गॅस नाही, तर चूलच पेटवू!” असा निर्धार व्यक्त करत महिलांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

मोठ्या संख्येने महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला. वाढत्या महागाईमुळे आणि गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे जीवन कसे विस्कळीत झाले आहे, याची झलक या आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आली.

या प्रसंगी राज्याध्यक्षा कॉ. नसीमा शेख यांनी आक्रमक भाषण करत सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य महिला व कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गॅससारख्या मूलभूत गरजेच्या बाबतीतही नागरिकांना संघर्ष करावा लागत असेल, तर हे सरकारचे अपयश आहे.”

आंदोलनादरम्यान “महागाई कमी करा”, “गॅस पुरवठा सुरळीत करा” अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच, तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा व दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी करण्यात आली.

या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले. महिलांच्या या तीव्र व सर्जनशील आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सचिव शेवंता देशमुख, राज्य समिती सदस्य अफसाना बेग, गीता वासम, जलालबी शेख, रसूला शेख, फातिमा मडकी, साहेब शेख, परविन शेख, तबसुम शेख, जमील शेख, अरुणा रासकोंडा, उमा बोगा, लक्ष्मी माचेर्ला, जमुना कळसकर आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages