सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी खा. प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करावी- सुदीप चाकोते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 7, 2026

सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी खा. प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करावी- सुदीप चाकोते

 सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी खा. प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करावी- सुदीप चाकोते

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करावी, अशी ठाम आणि स्पष्ट मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते सुदीप चाकोते यांनी केली. दिल्लीहून आलेले निरीक्षक तथा ओरिसाचे आमदार देवशेष पटनायक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत त्यांनी आपली भूमिका निर्भीडपणे मांडली.

चाकोते म्हणाले की, सध्या सोलापूर काँग्रेस केवळ संघटनात्मक अडचणीत नाही, तर अस्तित्वाच्या निर्णायक टप्प्यावर उभी आहे. अशा परिस्थितीत केवळ औपचारिकतेपोटी पद भरून चालणार नाही, तर पक्षाला नवजीवन देणारे आणि जनतेमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करणारे सक्षम नेतृत्व आवश्यक आहे.

शहराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, ब्लॉक, बूथ आणि वॉर्ड पातळीवर अनेक कार्यकर्ते सक्षम आहेत. मात्र सध्याची लढाई ही स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून काँग्रेसच्या सन्मान, अस्तित्व आणि भविष्यातील पुनरुत्थानाशी निगडित आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव पुढे करत चाकोते यांनी त्यांचे नेतृत्व हे संघर्षशील, जिद्दी आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे असल्याचे नमूद केले. “त्यांचे नेतृत्व हे केवळ पद नसून एक चळवळ आहे. त्यांच्या नावावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि जनतेशी त्यांची थेट नाळ जोडलेली आहे,” असेही ते म्हणाले.

प्रणिती शिंदे या तरुण, तडफदार, आक्रमक आणि समंजस नेतृत्वाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी संघटना उभी करण्याची क्षमता आणि पक्षाला पुनरुज्जीवित करण्याची ताकद त्यांच्या ठिकाणी असल्याचे अधोरेखित केले.

“सोलापूर काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची असेल, तर निर्णयही धाडसी घ्यावा लागेल. प्रणिती शिंदे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती ही केवळ योग्य निवड नसून जिल्ह्यात काँग्रेसच्या पुनरुत्थानाची निर्णायक सुरुवात ठरेल,” असा विश्वासही चाकोते यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages