ॲड. शंकर चव्हाण यांची जनहित लोकशाही पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2026

ॲड. शंकर चव्हाण यांची जनहित लोकशाही पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती

 ॲड. शंकर चव्हाण यांची जनहित लोकशाही पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती




 

मुंबई  (कटूसत्य वृत्त):-जनहित लोकशाही पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत, पक्षाने ॲड. शंकर चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (प.) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील विकास कार्याला नवीन दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अशोकराव अल्हाट साहेब यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय प्रबोधनकार आदरणीय रामराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या विचारधारेप्रती ॲड. चव्हाण यांनी दाखविलेली निष्ठा, त्यांचा सामाजिक व राजकीय अनुभव तसेच संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली असल्याचे पक्षाच्या अधिकृत निवडपत्रात नमूद करण्यात आले आहे.


ॲड. शंकर चव्हाण हे कायदा, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक जीवनातील एक सक्रिय आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला असून, युवक, शेतकरी, कामगार आणि महिलांच्या न्याय व हक्कांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा विचार करूनच पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.


निवडपत्रात नमूद केल्याप्रमाणे, ॲड. चव्हाण यांच्यावर महाराष्ट्रातील पक्ष संघटना मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांची बांधणी करणे तसेच पक्षाच्या ध्येय-धोरणांचा व्यापक प्रसार करणे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकट करून अधिकाधिक आमदार व खासदार निवडून आणण्यासाठी ते प्रभावी नेतृत्व करतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.


या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना ॲड. शंकर चव्हाण यांनी सांगितले की, “जनहित लोकशाही पार्टीसोबत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (प.) म्हणून नवी जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी केवळ पद नाही, तर जनतेसाठी सेवा करण्याची मोठी संधी आहे. युवक, शेतकरी, कामगार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी कटिबद्ध राहून प्रामाणिकपणे काम करणार आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन.”


देशात महाराष्ट्र हा राजकारणात अत्यंत प्रभावी भाग मानला जातो. सहकार क्षेत्र, शेती, उद्योग आणि सामाजिक चळवळींमुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. अशा या महत्त्वाच्या प्रदेशात पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी ॲड. चव्हाण यांची निवड ही रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.


पक्षाच्या वतीनेही ॲड. चव्हाण यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात संबंध महाराष्ट्रात जनहित लोकशाही पार्टी अधिक मजबूत होऊन एक प्रभावी राजकीय पर्याय म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्यभरातून ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages