आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करा; नियमभंगास कारवाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. उत्सव आनंदाने व उत्साहात साजरा करावा; मात्र कोणीही कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिला.
पोलीस आयुक्तालयात बुधवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. १४ ते १९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या जयंती उत्सवाच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. प्रारंभी पोलीस उपआयुक्त अश्विनी पाटील यांनी प्रस्तावना करत बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी रॉकी बंगाळे यांनी दोन्ही मध्यवर्ती मंडळांना एकत्र आणल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे कौतुक केले. डॉल्बी संदर्भातील निर्णय सर्वांनी मान्य केल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत दशरथ कसबे, अरुण भालेराव, राजाभाऊ इंगळे, उत्सव अध्यक्ष लौकिक इंगळे, नागेश इंगळे, बबलू गायकवाड, सुबोध वाघमोडे, पिंटू डावरे, सत्यजीत वाघमोडे आदींनी आपली मते व्यक्त केली.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, मिरवणुकीत सर्व मंडळांना समान संधी मिळावी. एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबू नये आणि सुमारे १५ मिनिटांत पुढे सरकावे. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल अशी कोणतीही कृती टाळावी.
यावेळी महानगरपालिका, महावितरण, आरटीओसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मंडळांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. बैठकीस पोलीस उपायुक्त विजय कवाडे, गौहर हसन, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महावितरणचे अभियंता राजकुमार पाटील यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
**चौकट : पोलीस प्रशासनाला सहकार्य**
मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत, झाडांच्या फांद्या छाटाव्यात तसेच उत्सव काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी करण्यात आली. डॉल्बीच्या मुद्द्यावरून काही जणांकडून मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी उत्सव काळात पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू, असे मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.
चौकट : संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून जयंती मिरवणुकीबाबत शहरात चर्चा सुरू असून काही मंडळींकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, शहराची परंपरा कायम ठेवत पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढली जाईल आणि प्रत्येक मंडळाला सहभागी होण्याची संधी दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

No comments:
Post a Comment