विकास कामांसाठी सत्तेसोबत जाण्याची गरज : भगीरथ भालके
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- : पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सत्तेसोबत जाणे आवश्यक असल्याचे मत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांच्या संमतीनेच पुढील राजकीय निर्णय घेतला जाईल, असे सांगत त्यांनी शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले.
भालके यांनी मंगळवेढा व पंढरपूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, पदासाठी नव्हे तर विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि कार्यकर्त्यांवरील अन्याय थांबवण्यासाठी सत्तेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्यांच्या या भूमिकेला कार्यकर्त्यांनी हात वर करून एकमताने समर्थन दिले.
येत्या १२ एप्रिल रोजी भगीरथ भालके आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अनिल सावंत यांनीही शिवसेना प्रवेशाचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भालके गटाचा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी शिवसेनेकडे झुकाव दाखवला आहे. पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला अनिल सावंत, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव यांच्यासह विविध गावांतील सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भालके यांनी आरोप केला की, गेल्या दोन वर्षांत स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतींचा निधी अडवला असून अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. तसेच पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलली नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
**चौकट : उपमुख्यमंत्र्यांकडून विकास कामांना पाठबळ**
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीला नागरिकांनी कौल दिला. मात्र विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी सत्तेसोबत राहणे आवश्यक असल्याचे भालके यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन करत आवश्यक ती मदत व नगरविकास खात्यामार्फत कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे भालके यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment