सोलापूरात ५० हजारांहून अधिक मिळकती महापालिकेच्या नोंदीबाहेर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील सुमारे सव्वातीन लाख मिळकतींपैकी तब्बल ५० हजारांहून अधिक मिळकतींची नोंद महापालिकेकडे नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असून, मिळकतदारांना स्वतःहून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांची कर आकारणी करण्यात येणार आहे. जर सर्वेक्षणादरम्यान अशा मिळकती आढळल्या, तर संबंधित मिळकतदारांकडून मागील सहा वर्षांचा कर वसूल केला जाईल.
दरम्यान, मिळकतदारांनी पुढील तीन महिन्यांच्या आत स्वतःहून अर्ज करून आपल्या मिळकतीची नोंद करून घेतल्यास त्यांना ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेच्या मिळकत कर संकलन विभागाकडून या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले असून, शहरभर टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवली जाणार आहे.
शहरातील या नोंद नसलेल्या मिळकतींना महापालिकेकडून पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या नागरी सुविधा मिळत असतानाही त्यांच्याकडून कर वसुली होत नाही. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचना ना. गोरे यांनी दिल्यानंतर प्रशासनाने या दिशेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
No comments:
Post a Comment