ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी सायकलिंग कडे वळावे- आ. रणजितसिंह मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 8, 2026

ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी सायकलिंग कडे वळावे- आ. रणजितसिंह मोहिते पाटील

 ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी सायकलिंग कडे वळावे- आ. रणजितसिंह मोहिते पाटील


अकलूज (कटूसत्य वृत्त):- श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या सायकल वारीच्या माध्यमातून आज आरोग्य उत्तम रहावे म्हणून ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सायकलिंगकडे वळले आहेत ही अभिमानाची बाब आहे. या ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी
सायकलिंगकडे वळावे असे आवाहन आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.

सायकल रायडर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिन व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित अकलूज ते अकलूज या सुमारे ७५ किलोमीटर माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथून सकाळी ६ वाजता अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते या सायकल राईडचा शुभारंभ करण्यात आला. अकलूज - माळीनगर -२५/४ - महाळुंग - श्रीपूर - बोरगाव - माळखांबी - बोंडले - वेळापूर - खुडूस - माळशिरस - संग्रामनगर - अकलूज असा या सायकल राईडचा मार्ग होता .

माळशिरस येथे पंचायत समिती सभागृहात सभापती दत्ताभैय्या मगर यांनी सायकल रायडर्सचे स्वागत केले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात आ मोहिते पाटील बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सभापती दत्ताभैय्या मगर , इशिता मोहिते पाटील, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सायकलिंग काळाची गरज या विषयावर आंतरराष्ट्रीय सायकल रायडर्स सतीश जाधव (मुंबई) यांचे व्याख्यान झाले. ते
म्हणाले , सायकल राईड सारखे उपक्रम समाजात आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करतात, एकत्रितपणे सकारात्मक ऊर्जा देतात आणि नव्या पिढीला योग्य दिशा दाखवतात. घुमाण सायकल वारीने आरोग्य संपन्न वारीचा नवा आदर्श घालून दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले , सायकलिंगला अनन्य साधारण महत्व आहे. पूर्वी गरिबीमुळे सायकलीने प्रवास करावा लागत होता. आज आरोग्य उत्तम रहावे म्हणून सायकलिंग करावी लागत आहे ही चांगली बाब आहे.
अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी सायकल रायडर्सना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
या राईडचे आयोजन सायकल रायडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष डॉ सुभाष कोकणे, सचिव सुरेंद्र पिसे, सह सचिव सुधाकर सोनवणे, विश्वस्त हर्षल सरोदे यांनी केले होते.

चौकट
सायकल राईडचे ठिकठिकाणी उत्साही स्वागत

सायकल रायडर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या अकलूज ते अकलूज या सुमारे ७५ किलोमीटर सायकल राईडचे श्रीपूर येथे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या पांडुरंग सायकल क्लबने, बोंडले येथे डॉ जयंत चव्हाण, वेळापूर येथे रिपाइंचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी, खुडूस येथे माजी सभापती मच्छिंद्र ठवरे यांनी, चव्हाण वस्ती येथे संदीपान चव्हाण यांनी तर अकलूज येथे अकलूज नगर परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages