हरामखोर भोंदू बागेश्वरच्या वक्तव्यावरून वाद; कायदेशीर कारवाईची मागणी
'अशा भोंदू बाबांना मोठं करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केलं पाहिजे', संभाजीराजे छत्रपती संतापले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात भोंदू बागेश्वर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बदनामकारक वक्तव्य केल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दास शेळके (ज्येष्ठ नेते, मराठा महासंघ) यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दास शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याचा आणि इतिहासाचा अभ्यास न करता केलेली विधाने ही केवळ दिशाभूल करणारी आणि समाजात तणाव निर्माण करणारी आहेत. “इतिहासात कुठेही नसलेल्या गोष्टी सांगणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे होय. अशा प्रकारचे बिनबुडाचे वक्तव्य करणे अत्यंत निषेधार्ह आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या माध्यमातून शेतकरी, सामान्य जनता आणि स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण केले. त्यांच्या प्रशासनात न्याय, शिस्त आणि लोककल्याणाला प्राधान्य होते. अशा महान व्यक्तिमत्त्वाबद्दल चुकीची माहिती पसरवणे हा इतिहासाचा अपमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
“जर या हरामखोर बागेश्वरला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन तज्ज्ञांकडून अभ्यास करावा,” असा सल्लाही शेळके यांनी दिला. तसेच, अशा अर्धवट आणि चुकीच्या विधानांमुळे समाजात गैरसमज पसरू शकतात, त्यामुळे संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या वक्तव्यामुळे सामाजिक आणि राजकीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटत असून, विविध संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी आंदोलनाचीही चेतावणी देण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वाढत आहे.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 'अशा भोंदू बाबांना मोठं करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केलं पाहिजे', असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारने या भोंदू बाबाला महाराष्ट्रात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी, अशी मागणी देखील संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी काय म्हटलं?
'धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो. लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात. राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात,हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा भोंदू बाबांना मोठं करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केलं पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी', अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
चौकट
अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली
'छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. हिंदू राष्ट्राच्या उभारणीची संकल्पना आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली आहे. ते आपल्या गुरूप्रती किती समर्पित होते, हे सांगण्याचा प्रयत्न मी केला होता. मात्र, काही हिंदू विरोधी शक्तींकडून माझ्या वक्तव्याला चुकीचे दाखवण्यात आले. तरीही, माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर मी माफी मागतो', असे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.
चौकट
"देवेंद्र फडणवीसांनी विकृताचा उल्लेख 'साधू-संत' असा केला"
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, 'विकृत धीरेंद्र शास्त्रीने (बागेश्वर बाबा) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच विकृताचा उल्लेख 'साधू-संत' असा केला. हा महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा अपमानच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते आधुनिक काळातील गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणी आणि लेखणीने समृद्ध केलेल्या संत परंपरेशी या ढोंगी बागेश्वर बाबाला जोडताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.'
चौकट
'उत्तर भारत झुकला, सह्याद्री उभा राहिला'; अमोल कोल्हेंचा धीरेंद्र शास्त्रींना झणझणीत टोला!
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, "उत्तर भारताने मुघल आक्रमणासमोर पळी पंचपात्र गुंडाळून मान झुकवली असताना, मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पातानं, सह्याद्रीच्या कातलावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला, त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याची गरज नाही."
'छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ दैवतच नाही, श्वास, नसात, रोमा-रोमात आहेत. ती आमची अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख आहे. काल, आज आणि उद्याही!' असा घणाघात खासदार कोल्हे यांनी केला.

No comments:
Post a Comment