श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानकडून मटके वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कडक उन्हाळ्यात नागरिकांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या सामाजिक जाणीवेतून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने मटके (डेरा) वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मुरारजी पेठ येथील विजयप्रकट हनुमान मंदिर, उमा नगरी येथे आयोजित या कार्यक्रमात वस्तीतील तसेच पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मटके वाटप करण्यात आले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर थंड पाणी सहज उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. या प्रसंगीप्रमुख पाहुणे म्हणून डिसीएम कार्यालयचे अधीक्षक साधना शिंदे, बालाजी मंदिरचे ट्रस्टी सुहास लाहोटी, समाजसेवक प्रभू पडसलगी तसेच संस्थेचे अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रतिष्ठानच्या वतीने हा नववा सामाजिक उपक्रम असून, दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एकूण दहा विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महेश कासट यांनी दिली.
प्रतिष्ठानच्या वतीने दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दहा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यापैकी याआधी विद्यार्थी दत्तक योजना, अन्नधान्य व सॅनिटरी पॅड वितरण, स्टील पाणी टाकी स्थापना, दिवाळी फराळ वाटप, वेशभूषा व चित्रकला स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांना चादर वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता कासट यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश ढेंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत व्हानकळस, प्रकाश आंळगे, निशांत वाघमारे, गणेश माने, शिला तापडिया, रंजना ढेंगळे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment