सुनेत्रा पवारांच्या खमक्या नेतृत्वाची चुणूक
चाकणकर, अरोराच नाही तर 'लेडी बॉस'चा तटकरे, पटेलांनाही धक्का
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी पक्षातील मोठ्या नेत्यांमध्ये एकच चढाओढीने सुरु झालेला सत्तासंघर्ष अवघ्या देशाने पाहिला.
पक्षात नवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडप्रक्रिया पूर्वीच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याचे वक्तव्य केले होते. मात्र अवघ्या काही तासांतच त्यांनी वक्तव्य मागे घेऊन परिस्थिती शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोयलांच्या या वक्तव्याने पक्षात अंतर्गत सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही पटेल यांनी पक्षाचे सर्व अधिकार आपल्याला मिळावेत याबाबत निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केला होता. यामुळे पक्षात पवार विरुद्ध पटेल, तटकरे असा सौम्य पण अंतर्गत तीव्र धुसफुसीने माजलेला सत्तासंघर्ष सुरु असेलेला ठळकपणे दिसून येतो.
पक्षाचे सर्वेसर्वा असेलेल्या सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याआधीच पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी पटेल - तटकरे यांची धडपड, त्याबाबत निवडणूक आयोगाशी केलेला पत्रव्यवहार समोर आल्यानंतर पवार या पटेल - तटकरेंवर तीव्र नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातच अजित पवार ह्यात असताना पक्षाला गुलाबी रंगात झोकळणारे, राजकीय पक्ष डिझाईन रणनीतीकार नरेश अरोरा यांनाही सुनेत्रा पवारांनी बाहेरचा रस्ता दाखवला. तर नुकत्याच आयोगाला पाठवलेल्या एका पत्रात पवारांनी तटकरे आणि पटेलांच्या पदांचा उल्लेख जाणीवपूर्णक टाळून त्यांनाही पक्षात आपली जागा दाखवल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष दावा करणाऱ्या पक्षातील सर्व नेत्यांचे पंख छाटण्याचे काम सुनेत्रा पवारांनी हाती घेतल्याचे दिसते. पक्षामध्ये आपणच एकमेव बाॅस असल्याचा संदेश पवारांनी पक्षात पोहोचवला. यामुळे पक्षात जो कोणी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कारवाया करतील, त्यांना त्यांची जागा दाखवण्याची तयारी सुनेत्रा पवारांनी अप्रत्यक्षपणेच मागील काही कृतीतून दाखवून दिले. पक्षाची पाॅवर ही फक्त पवारांच्या हातात आहे, असा स्पष्ट संकेत पक्षात वरिष्ठ पातळीपासून ते तळापर्यंत पोहचवण्यात सुनेत्रा पवार यशस्वी ठरल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवारांचा एक हाती 'होल्ड' होता. आता अजित पवारांनंतर आपल्याच हाती राष्ट्रवादी काँग्रेसची संपुर्ण धुरा आहे, ती कायम राहिल याची सर्व काळजी सुनेत्रा पवार घेत आहेत. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खमक्या नेतृत्वाची चुणूक दाखवत, एका नव्या आयर्न लेडीचा उदय झाला, असे म्हंटल्यास काहीच वावगे ठरणार नाही. सुनेत्रा पवारांच्या रुपातल्या या आयर्न लेडी पक्षावर एकहाती वचक निर्माण करुन, पक्ष संघटनेवर अधिकाधिक घट्ट पकड निर्माण करतील, असे तरी आज चित्र दिसत आहे.
काय आहे वाद?
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 25 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी 2026 रोजीनंतर पक्षाने केलेला कुठलाही पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी विनंती केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी आरोप केला होता की, अजितदादांचे निधनानंतर 18व्या दिवशी अर्थात 16 फेब्रुवारीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. त्या पत्रावर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या होत्या. दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगाला म्हटले होते की, आमच्या पक्षाची घटना बदलली आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल आणि नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे (कार्यकारी अध्यक्ष) पक्षाची ताकद असेल, तर ते सर्व निर्णय घेतील. मात्र पक्षाच्या विद्यमान अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना या पत्राची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र लिहिले, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. हे पत्र बुधवारी समोर आले आणि खळबळ उडाली आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होते, तेव्हा निवडणूक आयोगाकडे पक्षाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोण -कोण आहे? आणि त्यांच्या नावाची यादी निवडणूक आयोगाला पाठवावी लागते. त्यानुसार 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत 13 नावांचा उल्लेख केला होता. या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्षा आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर खजिनदार असा होता. मात्र प्रफुल पटेल हे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष आहेत, तर सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असतानाही दोन्ही नेत्यांच्या समोर त्यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर आता सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना दोन्ही नेते अनुपस्थित आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
चौकट-
पार्थ पवारांकडून तीव्र शब्दांत निषेध
पार्थ पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारे निराधार अहवाल आणि केवळ तर्कवितर्कांवर आधारित कथा म्हणजे निव्वळ कल्पित कथाच आहेत. त्यांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हा सर्वांना आजही मार्गदर्शित करत आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध व्हायलाच हवा, असे म्हणत पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
.png)
No comments:
Post a Comment