१ मेपर्यंत ऊसबिल न दिल्यास कारखानदारांच्या दारात ठिय्या आंदोलन : राजू शेट्टी यांचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 25, 2026

१ मेपर्यंत ऊसबिल न दिल्यास कारखानदारांच्या दारात ठिय्या आंदोलन : राजू शेट्टी यांचा इशारा

 १ मेपर्यंत ऊसबिल न दिल्यास कारखानदारांच्या दारात ठिय्या आंदोलन : राजू शेट्टी यांचा इशारा



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील सुमारे १०० साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे दोन ते चार पंधरवड्यांचे ऊसबिल थकीत ठेवण्यात आले आहे. येत्या १ मेपर्यंत हे थकीत बिल अदा न केल्यास संबंधित कारखान्यांच्या चेअरमनच्या दारात बसून ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पंढरपुरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, विजय रणदिवे, माजी उपसभापती विष्णू बागल, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संचालक संतोष बागल, अजित बोरकर, नानासाहेब चव्हाण, सुशील शिंदे आदी उपस्थित होते.

शेट्टी पुढे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखाने १५ फेब्रुवारी रोजी बंद झाले असून, दोन महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळालेले नाहीत. राज्यभरात सुमारे ६ हजार कोटी रुपये ऊसबिल थकीत असून, त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातच ३६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, या गंभीर प्रश्नावर जिल्ह्यातील एकाही आमदाराने विधिमंडळात आवाज उठवलेला नाही, ही खेदजनक बाब असल्याची टीका त्यांनी केली.

साखर आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने, आगामी काळात साखर आयुक्तांना घेराव घालून जाब विचारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. गरज पडल्यास कारखानदारांनी त्यांच्या घरातील मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत,” असा इशाराही त्यांनी दिला.


चौकट : शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम

शक्तीपीठ महामार्गाबाबतही शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, माढा, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही हा महामार्ग राबविला जात आहे. मुळात नव्या महामार्गाची गरज नसून, या प्रकल्पामुळे राज्यावर सुमारे एक लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढणार आहे. राज्यकर्त्यांना निधी उभा करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी शक्तीपीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages