लोककल्याणकारी योजना गरजूपर्यंत पोहचविणार- सभापती सौ. सातपुते
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग हा ग्रामीण जीवनातील योजनांचा अंमलबजावणी करणारा महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या लोककल्याणकारी योजना गरीब व गरजू लाभार्थ्यांपर्यत तसेच शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच दिव्यांग बंधु- भगीनी यांच्यापर्यत पोहोचविण्यासाठी हा विभाग सदैव तत्पर राहील त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याची भुमिका अतिशय महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या समितीच्या समन्वय सभेमध्ये समाज कल्याण सभापती सौ. संस्कृती सातपुते यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या समाजकल्याण समितीच्या बैठकीमध्ये समाजकल्याण सभापती सौ. संस्कृती सातपुते या बोलत होत्या. यावेळी समाजकल्याण समिती मधील सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य सौ. सुप्रिया गायकवाड, सौ. सिंधुताई आलदर, सौ. करुणा शिवशरण, सौ. सविता उंबरजे, कु. श्रुती भोरगुंडे, सौ. तेजस्वीनी बोराडे, सौ. शिवानी स्वामी, प्रशांत पाटील, नंदकुमार वाघमारे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्यासह समाजकल्याण विभागातील जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रारंभी उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य यांचा समाजकल्याण सभापती सौ. संस्कृती सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचा सन 2025-26 मध्ये 20% मागासवर्गीय कल्याण व 5% दिव्यांग कल्याण योजनाना सन 2026-27 मध्ये मुदतवाढ, सन 2026-27 मधील मुळ अंदाजपत्रकानुसार घेण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत प्रशासकिय व तांत्रिक मान्यता, अनु-जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेतर्गत सन 2025-26 अंशत: काम बदल/ वस्ती बदल प्रस्तावास मान्यता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करणेबाबत खर्चास जि. प. सेस 2026-27 मधुन तरतुदीस समाजकल्याण समितीची मंजूरी देण्यात आली. समाजकल्याण विभागाकडील विविध कार्यासन शिष्यवृत्ती , अनु. वस्तीगृह, जि प सेस. वृध्दाश्रम, अनु-जाती व नवबौध्द घटकांचा वस्त्यांचा विकास करणेबाबत सर्व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. याबाबत सदर सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
समता सप्ताह साजरा करताना जिल्हा स्तरावर अत्यंत बारकाईने सुंदर नियोजन केल्याबदल मा. सभापती यांनी समाजकल्याण अधिकारी श्री. मिरकले व विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे तसेच सचिन सोनकांबळे कार्यालयीन अधिक्षक व इतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तालुका स्तरावर देखील दर्जेदार चागंल्या वक्तृत्व स्पर्धा झालेल्या असुन तात्काळ त्याचे व्ही.डी.ओ. व यशोगाथा सादर करण्याबाबत सुचना करण्यात आल्या. समता पंधरवडा कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा यांच्या पवित्र विचारांचा जागर झाला आहे. जिल्हा स्तरावर बक्षिस वितरण समारभ कार्यक्रम आयोजित करुन स्पर्धेतील 7 वी ते 12वी च्या विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपुर्वक बक्षिस वितरण मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये करण्यात येणार आहे. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचा सविस्तर आढावा सभेपुढे दिला. योजना निहाय माहिती विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे व स्वाती गायकवाड यांनी दिली.

No comments:
Post a Comment