तीन लाख कुटुंबांना रॉकेल; साेलापूर जिल्ह्यासाठी केरोसिनचा कोटा ठरला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युद्धामुळे गॅस टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गॅस टंचाईवर तोडगा काढण्यासाठी शासनाने केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ज्यांना रॉकेल दिले जाणार आहे असे तीन लाख कुटुंब रेशनकार्डधारक असून त्यापैकी केवळ ३० हजार म्हणजे १० टक्के कुटुंबांकडेच स्टोव्ह असल्याचे समोर आले आहे.
एप्रिलमध्ये केरोसिनचा पुरवठा होणार आहे. सोलापूर शहरासाठी १२ हजार लिटर तर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी १ लाख ३२ हजार लिटर केरोसिन मिळणार आहे. एप्रिलमध्ये सोलापूर शहर व ग्रामीणसाठी १ लाख ४४ हजार लिटर केरोसिनचा कोटा निश्चित झाला आहे. एका रेशनकार्डधारक कुटुंबाला तीन लिटर केरोसिन दिले जाणार आहे.
युद्ध स्थितीमुळे एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरणाचा निर्णय झाला आहे. गेल्या १० वर्षात स्टोव्ह वापराची संख्या प्रचंड घटली आहे. सोलापूर शहरात स्टोव्ह वापरणाऱ्या कुटुंबाचा सर्व्हे अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने केला. यामध्ये निराशाजनक माहिती समोर आली आहे.
शहरातील ३ लाख रेशनकार्डधारक कुटुंबांपैकी जेमतेम १० टक्क्यांच्या आतच कुटंब स्टोव्ह वापरत असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. शासनाने तीन लिटर केरोसिन दिल्यानंतर आता अनेकांना नव्याने स्टोव्ह विकत घ्यावा लागणार आहे.
वाटपाचे नियोजन
ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. स्थलांतरीत मजूर देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक यांनी शिधापत्रिकाधारक/शिधापत्रिकाधा रक नसलेले लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ३ लिटर प्रमाणे केरोसीन वाटप करणार आहेत. एखाद्या गावामध्ये केरोसीन विक्रता उपलब्ध न झाल्यास त्या गावातील रहिवाशांना नजीकच्या गावातून केरोसीन उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
वाटपचा अहवाल, निरीक्षण पथक
जिल्ह्यातील वाटप, उचल, वितरण व शिल्लक याचा साप्ताहिक अहवाल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला पाठवावा लाणार आहे. केरोसीनच्या गैरवापरावर नजर ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर संयुक्त निरीक्षण पथक स्थापन केले जाणार आहे. केरोसिनचा वापर पेट्रोल/डिझेलमध्ये भेसळ करण्याकरीता होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

No comments:
Post a Comment