पोटच्या मुलींना उलटे टांगणाऱ्या बापावर खुनाचा गुन्हा; एकीचा मृत्यू, दुसरीची प्रकृती गंभीर
आटपाडी (कटूसत्य वृत्त) – सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ चोरीच्या संशयावरून एका निर्दयी बापाने स्वतःच्या दोन मुलींना रात्रभर घराच्या तुळईला उलटे टांगून ठेवले. या अमानुष छळामुळे १० वर्षीय सानिका यमगर हिचा मृत्यू झाला असून ११ वर्षीय अनुजा यमगर ही गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना हैबत यमगर (वय ३८) याला चार मुली व एक मुलगा आहे. दोन मुलींनी चुलत्याच्या घरात चोरी केल्याचा संशय त्याला आला होता. याच रागातून बुधवारी (२५ मार्च) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास त्याने सानिका व अनुजा या दोघींचे हातपाय बांधून त्यांना घरातील छताच्या तुळईला उलटे टांगले.
रात्रभर दोन्ही मुली डोके खाली व पाय वर अशा अवस्थेत तडफडत होत्या. त्या दोघींनी पाणी व सोडवण्याची विनंती केली, मात्र पाषाणहृदयी बापाने त्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे, तर मुलींना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजोबांनाही आरोपीने मारहाण केल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी (२६ मार्च) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुली बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्यांना खाली उतरवण्यात आले. तोपर्यंत सानिकाचा मृत्यू झाला होता. अनुजाला तातडीने आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर अनुजाने डॉक्टरांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर हा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी नाना यमगर याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण आटपाडी तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment