भोंदू खरात प्रकरणी संबंधितांचीही एसआयटी चौकशीची मागणी
नाशिक (कटूसत्य वृत्त) : भोंदू खरात प्रकरणाला नवे वळण मिळत असून, त्याच्याशी संबंधित राजकीय व्यक्ती आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी करत एसआयटी पथक प्रमुखांकडे याबाबत निवेदन दिल्याची माहिती दिली.
अंधारे यांनी सांगितले की, खरातच्या संस्थांना आणि फार्महाऊसला झालेल्या पाणीपुरवठ्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मिरगाव येथील ग्रामस्थांच्या ठरावानुसार, तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने जीआर काढला होता. मात्र, एका महिला पदाधिकाऱ्याच्या शिफारशीवरूनच हा पाणीपुरवठा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेला निधी देण्यामागील कारणे, त्याला बंदुकीचा परवाना कोणी दिला आणि त्याचे नूतनीकरण कोणाच्या कार्यकाळात झाले, याबाबत सत्ताधाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हानही अंधारे यांनी दिले. सत्ताधाऱ्यांना दीड वर्षांपासून या प्रकरणाची माहिती असताना २०२४ मध्ये परवान्याचे नूतनीकरण का करण्यात आले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणात संबंधितांची नावे समोर आली असून, शासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पीडितांच्या ओळखी उघड होण्याबाबत चिंता
या प्रकरणात अनेक पीडित महिलांच्या व्हिडिओ क्लिप्स समोर येत असल्याने त्यांच्या ओळखी उघड होत आहेत. यावर तातडीने पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली ठोंबरे यांनी केली.
त्याचबरोबर, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दोन महिन्यांपूर्वीच या प्रकाराची माहिती दिली होती. त्या वेळीच कारवाई झाली असती, तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असती, असा आरोप ठोंबरे यांनी केला. गुन्हा दाखल करण्याऐवजी आर्थिक तडजोडीवर भर दिल्यामुळे पीडितांची संख्या वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा आणि प्रशासनाच्या भूमिकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

No comments:
Post a Comment