गॅस पुरवठ्यावर परिणाम; सोलापुरात आपत्कालीन कक्ष सुरू, नागरिकांना तक्रार नोंदविण्याचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गॅस सिलिंडर वितरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू करत जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन कक्षाची स्थापना केली आहे.
नागरिकांना गॅस किंवा पेट्रोल वितरणासंदर्भात कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास ०२१७-२७३१०१२ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन कक्षात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी अनावश्यक साठवणूक करू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील गॅस वितरणाबाबत तक्रारींसाठी तालुकानिहाय पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. तसेच शहरी भागासाठी परिमंडल अधिकारी व पुरवठा निरीक्षकांचे स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment