वाचन चळवळ अधिक समृद्ध व्हावी : गाडेकर
पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : ग्रंथ आणि वाचन ही पवित्र व समाजहिताची चळवळ अधिक व्यापक व समृद्ध व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्रंथालयांनी वाचकांची वाट न पाहता स्वतः वाचकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सोलापूर ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. यावेळी गाडेकर यांनी ग्रंथालय चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे होते. यावेळी जोतिराम गायकवाड, मराठी भाषा अधिकारी प्रमोद पाटील, ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे, प्रदीप गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुंडलिक मोरे यांनी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचा आढावा घेतला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल, वाचक तसेच पुस्तक प्रकाशकांचा सन्मान करण्यात आला.
ग्रंथोत्सवाच्या सकाळच्या सत्रात साहित्यिक राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ‘कथाकथन’ कार्यक्रम झाला. कथाकार जयवंत आवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दुपारच्या सत्रात ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, लेखक गोविंद काळे आणि प्रा. डॉ. सुशीला पिंजारी यांनी सहभाग घेतला.
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकाशकांनी पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल उभारले होते.

No comments:
Post a Comment