फाईलवरील सहीवरून वाद; झेडपी सीईओंसमोरच अभियंत्यांची जुंपली
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोन कार्यकारी अभियंत्यांमध्ये फाईलवरील सहीच्या कारणावरून सोमवारी (दि. १६) मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासमोरच वाद निर्माण झाला. या घटनेची दिवसभर जिल्हा परिषदेत चर्चा रंगली.
बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे आणि विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खटके उडत असल्याचे समोर येत आहे. सोमवारी हा वाद थेट सीईओ जंगम यांच्या उपस्थितीतच उफाळून आल्याने कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान, सीईओ जंगम यांनी आतापर्यंत शिस्तभंगाच्या कारवायांबाबत सौम्य भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यामुळे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मनमानी होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित दोन्ही अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. सीईओ जंगम यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अशा प्रकारचे वाद वाढण्याची शक्यता असल्याने वेळेत कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment