आरोग्य-शिक्षणाला प्राधान्य; ४५.८३ कोटींचे जिल्हा परिषदेचे शिलकी अंदाजपत्रक सादर
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४५ कोटी ८३ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. प्रशासकीय कारकिर्दीतील हे त्यांचे चौथे अंदाजपत्रक आहे. आरोग्य व शिक्षणासाठी प्रत्येकी सुमारे ५ कोटींची तरतूद करण्यात आली असून महिला व बालकल्याण विभागासाठी ३ कोटी २५ लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत २०२५-२६ चे सुधारित आणि २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक मांडण्यात आले. सेसच्या माध्यमातून ४५ कोटी ८३ लाखांची आवक गृहित धरली असून ४५ कोटी ७४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यानंतर ८ लाख ९२ हजार रुपये शिल्लक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या अंदाजपत्रकात विविध विभागांसाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षण विभागासाठी ५ कोटी ३३ लाख, महिला व बालकल्याण ३ कोटी २५ लाख, पाणीपुरवठा ३ कोटी ९६ लाख, कृषी ३ कोटी ८५ लाख, पशुसंवर्धन ३ कोटी २० लाख, समाजकल्याण ४ कोटी ७२ लाख, लघुपाटबंधारे १ कोटी ५० लाख, बांधकाम विभागासाठी ८ कोटी ५० लाख, प्रशासन ५ कोटी २५ लाख आणि ग्रामपंचायत विभागासाठी २ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीपूर्वीच अंदाजपत्रक सादर केल्याने प्रशासनाने घाई केली असल्याची चर्चा रंगली आहे. यावर स्पष्टीकरण देताना मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सांगितले की, जिल्हा परिषद अधिनियमातील कलम ४५ (५) नुसार २७ मार्चपूर्वी अंदाजपत्रक मांडणे बंधनकारक होते. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतरच्या प्रक्रियेमुळे वेळेत सभा घेणे शक्य नसल्याने तांत्रिक कारणास्तव हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या अवलोकनासाठी हे अंदाजपत्रक ठेवण्यात येणार असून आवश्यक त्या सुधारणा पुढे करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment