मसाप मतमोजणीत गैरप्रकारांचा आरोप; परिवर्तन उत्कर्ष पॅनल न्यायालयात जाणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

मसाप मतमोजणीत गैरप्रकारांचा आरोप; परिवर्तन उत्कर्ष पॅनल न्यायालयात जाणार

 मसाप मतमोजणीत गैरप्रकारांचा आरोप; परिवर्तन उत्कर्ष पॅनल न्यायालयात जाणार

पुणे (कटूसत्य वृत्त) : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत परिवर्तन उत्कर्ष पॅनलने न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळेच निकाल प्रभावित झाल्याचाही आरोप पॅनलकडून करण्यात आला.
रविवारी पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहात मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीने प्रमुख तीन पदांवर विजय मिळवला. अध्यक्षपदी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक तर कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांची निवड झाली. एकूण ३१ पैकी २४ जागा विद्यमान सदस्यांनी मिळवल्या, तर ७ जागांवर विरोधी पॅनल विजयी झाले.
परंतु, सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनलने मतमोजणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्रुटी राहिल्या असून राजकीय लोकांच्या मदतीने ही निवडणूक “हायजॅक” केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. शासनातील मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी राजकीय निवडणुकीतील पद्धती वापरल्याचेही ते म्हणाले.
प्रमुख कार्यवाहपदाच्या पराभूत उमेदवार सुनीताराजे पवार यांनी मतदानाच्या आकडेवारीत विसंगती असल्याचा आरोप केला. “६२०० मतपत्रिका आम्ही जमा केल्या, मग त्या कुठे गेल्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अध्यक्षपदाचे उमेदवार प्रा. मिलिंद जोशी यांचा अवघ्या ४५ मतांनी झालेला पराभव संशयास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच, मृणालिनी कानिटकर-जोशी यांना मिळालेल्या मतांबाबतही गोंधळ झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना ८१६ मते मिळूनही अधिकाऱ्यांनी ७७७ मते दाखवून पराभूत घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोषाध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार विनोद कुलकर्णी यांनी मतमोजणी प्रक्रियेला “सदोष” ठरवत मतपत्रिका न दाखवता मोजणी केल्याचा आरोप केला. फेरमतमोजणीची मागणीही फेटाळण्यात आल्याने लोकशाही अधिकार हिरावला गेल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर टीका करत साहित्यिक संजय सोनवणी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. साहित्य संस्थांमध्ये वाढत्या राजकारणाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages