घरकुल हप्त्यासाठी लाच स्वीकारताना ग्रामपंचायत कर्मचारी जाळ्यात
पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारताना उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत अधिकारी व शिपाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार ग्रामस्थाला पंतप्रधान आवास योजनेतून १ लाख २० हजार रुपयांचे घरकुल मंजूर झाले होते. या रकमेचा अंतिम हप्ता मिळवून देण्यासाठी १३ मार्च रोजी पडताळणीदरम्यान ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांनी स्वतःसह ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत प्रकाश मुकरे यांच्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम १० हजारांवर आणण्यात आली.
दरम्यान, १६ मार्च २०२६ रोजी झालेल्या पडताळणीत ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत मुकरे यांनीही अंतिम हप्ता देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली व ती रक्कम शिपाई कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितले.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
No comments:
Post a Comment