योजना लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल होणार
मुंबई (कटूसत्य वृत्त) : महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत ही महत्त्वाची माहिती दिली.
उद्धवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, या योजनांमध्ये समाविष्ट रुग्णालयांशी करार करताना रुग्णांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेण्याची स्पष्ट अट असते. मात्र, काही ठिकाणी या अटीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे.
राज्यात अशा प्रकारच्या ३३८ प्रकरणांमध्ये आतापर्यंत ६० लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर आणखी २६६ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. अकोला जिल्ह्यात १२ तक्रारी प्राप्त झाल्या असून एका रुग्णाला पैसे परत करण्यात आले आहेत, तर उर्वरित ११ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले की, वारंवार कारवाई करूनही असे प्रकार थांबत नसल्याने आता कडक भूमिका घेत काही रुग्णालयांच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमान पाच रुग्णालयांवर तातडीने अशी कारवाई केली जाणार आहे.
यापुढे योजनांच्या अटींचे कोणतेही उल्लंघन सहन केले जाणार नाही. तक्रार प्राप्त होताच त्याच दिवशी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या चर्चेत काँग्रेसचे नाना पटोले, भाजपचे बबनराव लोणीकर आणि रणधीर सावरकर यांनीही सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment