मराठी शाळा वाचवा – शिक्षण वाचवा”चा नारा देत आंदोलन
पुणे (कटूसत्य वृत्त) :- राज्यातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे आणि रिक्त शिक्षक पदांची तात्काळ भरती करावी या मागण्यांसाठी “मराठी शाळा वाचवा – शिक्षण वाचवा” या घोषणेसह सोमवारी (९ मार्च) पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर मोठे धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील TAIT पात्र उमेदवार, डी.एड. व बी.एड. धारक युवक-युवती मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे शिक्षक भरतीसंदर्भात स्पष्ट रोडमॅप जाहीर करण्याची, राज्यातील रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरण्याची तसेच मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. वाढत्या रिक्त पदांमुळे शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या आंदोलनादरम्यान राज्याचे शिक्षण आयुक्त प्रताप सिंह तसेच शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे यांच्याशी प्रतिनिधी मंडळाने चर्चा केली. या चर्चेसाठी काॅग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांचा मुद्दा प्रशासनापुढे मांडला.
आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन प्रशासनाला दिले. यानंतर पुढील स्तरावर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, ही केवळ रोजगारासाठीची लढाई नसून मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीचा संघर्ष आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला राज्यभरातील विद्यार्थी, युवक-युवती, महिला तसेच शिक्षक बांधवांनी पाठिंबा दर्शवला. आंदोलनानंतर आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले.
आंदोलनानंतर शासन पुढे कोणती ठोस पावले उचलते, याकडे राज्यातील शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment