शेटफळ येथे तीन मटका एजंटांवर मोहोळ पोलिसांची धडक कारवाई
मोहोळ (कटूसत्य वृत्त) – तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात मोहोळ पोलीस दल अॅक्शन मोडमध्ये आले असून मटका व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेटफळ येथे एकाच दिवशी तीन मटका एजंटांवर कारवाई करत मोहोळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अवैध व्यवसायांवर लक्ष वेधल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
याआधी कुरुल रोडवरील याराना एंटरप्राइजेस येथील पत्रा शेडमध्ये चालणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला होता. त्या कारवाईनंतर शहरातील मटका व्यवसाय काहीसा थंडावला असतानाच शेटफळ येथे पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली.
२६ मार्च रोजी दुपारी डीबी पथकाने शेटफळ येथे छापा टाकून तानाजी महादेव चव्हाण (वय ५४), शकील अहमद तांबोळी (वय ४६) आणि ब्रह्मदेव नारायण ताटे (वय ५३) यांना ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार खेळताना रंगेहात पकडले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे तीन हजार रुपयांची रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तिघांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या धडक कारवाईमुळे मोहोळ शहर आणि तालुक्यातील मटका विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment