पंढरपुरकरांना स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करा, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करू - गणेश अंकुशराव
पंंढरपूर (कटूसत्य वृत्त):-पंढरपुरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी शिर्डी आणि तुळजापुर प्रमाणेच पंढरपुरकरांना स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करा अन्यथा आम्ही मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशारा पंढरीतील समाजसेवक, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय.
काल गुढी पाडव्याच्या निमित्ताने अनेक भाविक, वारकरी व पंढरपुरकरांनीही श्रीविठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती, यावेळी गणेश अंकुशराव हे कार्यकर्त्यांसह मंदिरात गेले, तेंव्हा एकीकडे व्हीआयपी दर्शन रांगेतुन काहीजणांना सोडले जात होते तर दुसरीकडं अनेक भाविक व स्थानिक पंढरपूरकर दर्शनासाठी तिष्ठत उभे होते. याचा व्हिडिओ गणेश अंकुशराव यांनी काढला व शिर्डी व तुळजापुरला ज्या पध्दतीने स्थानिक नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था आहे तशीच स्थानिक पंढरपुरकरांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची दर्शन व्यवस्था सुरू करावी अशी मागणी केली आहे.
जाणुन बुजुन मंदिर समिती ही स्थानिक पंढरपुरकरांचा अपमान करत असते, त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करू असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी व कार्यकर्त्यांनी मंदिरात मोठी घोषणाबाजी ही केलेली आढळून आली.

No comments:
Post a Comment