टेंभुर्णी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; १३,९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त, हॉटेल मालक ताब्यात
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात मोठी कारवाई करत यशश्री हॉटेलवर छापा टाकून देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला असून हॉटेल मालकाला ताब्यात घेतले आहे.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परि.सहा.पोलीस अधीक्षक (भा.पो.से) राहुल आत्राम यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टेंभुर्णी येथील पुणे-सोलापूर महामार्गालगत आकुंबे परिसरातील यशश्री हॉटेल येथे विनापरवाना देशी व विदेशी दारू साठवून विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून आज सायंकाळी सुमारे 6.30 वाजता छापा टाकला.
छाप्यात हॉटेलच्या परिसरात व पाठीमागील बाजूस औदुंबर सावळा करंडे (वय 51, रा. आकुंबे, ता. माढा) यांच्या ताब्यात विविध कंपनीच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. यामध्ये मॅकडॉल नंबर वन, इम्पेरियल ब्लू, आयकॉन व्हाईट, ग्रँड मास्टर मॅंगो, टू बर्ग बिअर, रॉयल स्टॅग, तसेच देशी दारूचे विविध प्रकार अशा एकूण 109 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत 13,910 रुपये इतकी आहे.
सदर दारू विनापरवाना व बेकायदेशीररीत्या साठवून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी औदुंबर करंडे यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद धनाजी अनभुले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत राहुल आत्राम यांच्यासह पोलीस हवालदार नितीन तळेकर, पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद अनभुले, मोहन तळेकर, चालक शरद बेंबळगे व आरटीपीसी सचिन भोसले यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकाॅ दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.

No comments:
Post a Comment