गावठाणास तीन, हद्दवाढ भागास पाच दिवसांनी पाणी; महापालिकेचा सुधारित निर्णय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2026

गावठाणास तीन, हद्दवाढ भागास पाच दिवसांनी पाणी; महापालिकेचा सुधारित निर्णय

 गावठाणास तीन, हद्दवाढ भागास पाच दिवसांनी पाणी; महापालिकेचा सुधारित निर्णय

सोलापूर (कटूसत्य वृत्त) – शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला असला, तरी लोकप्रतिनिधींच्या विरोधानंतर प्रशासनाने सुधारित निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता गावठाण भागात तीन ते चार दिवसांनी, तर हद्दवाढ भागात पाच दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पूर्वी महापालिकेने काही भागांत चार, पाच ते सात दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महापौर, उपमहापौर आणि अन्य लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्यात आले.

नवीन नियोजनानुसार पाणीपुरवठ्याचे तासही कमी करण्यात आले आहेत. ज्या भागात पूर्वी तीन तास पाणी दिले जात होते, तेथे आता दोन ते अडीच तास पाणीपुरवठा केला जात आहे. या उपाययोजनांमुळे पाण्याची बचत होऊन अधिक भागांना कमी अंतराने पाणी देणे शक्य होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

चौकट : विद्युत पुरवठा खंडित

महापालिका आयुक्त Sachin Ombase यांच्या आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी नागोबा मंदिर, रामवाडी येथील विहिरीची पाहणी केली. यानंतर त्या ठिकाणी बसविण्यात आलेला पंप काढून टाकत विहिरीवरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईमागे स्थानिक राजकीय वादाची किनार असल्याची चर्चा आहे.

चौकट : पाण्यावर ‘लोणी खाण्याचा’ प्रकार उघड

महापालिकेने अधिग्रहित केलेल्या विहिरीवर बसवलेल्या पंपाचे वीजबिल अनेक वर्षांपासून महापालिका भरत असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत भाजप नगरसेविकेने तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. माजी पदाधिकाऱ्यांकडून या पाण्याचा गैरवापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींमुळे शहरातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी संयमाने पाणी वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages