रुग्णांच्या फलकावर नावासह उपचारांची माहिती; जिल्हा रुग्णालयाचा उपयुक्त उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – गुरूनानक चौकातील जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची माहिती सहज मिळावी यासाठी प्रशासनाने उपयुक्त असा नवा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णालयातील प्रत्येक वार्डासमोर फलक लावून त्यावर रुग्णांचे नाव आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती नमूद करण्यात येत आहे.
सध्या या रुग्णालयात सुमारे १०० बेडची सुविधा उपलब्ध असून स्त्रीरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, बालरोग तसेच अपघात विभागासह विविध विभाग कार्यरत आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आले आहेत. संबंधित वार्डासमोर लावलेल्या फलकावर त्या वार्डातील रुग्णांची नावे व उपचारांची माहिती वैद्यकीय भाषेत लिहिली जात आहे.
या उपक्रमामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णाचा शोध घेण्यासाठी होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कोणता रुग्ण कोणत्या वार्डात दाखल आहे, हे थेट फलकावरून समजत असल्याने संबंधित वार्डापर्यंत सहज पोहोचणे शक्य होत आहे.
विशेषतः ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांना याचा मोठा फायदा होत असून त्यांची दमछाक टाळण्यास मदत होत आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
No comments:
Post a Comment