सांगोला(कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील जुनोनी, कोळा आदी भागाला गारपिटीने झोडपून काढल्याने रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, आधार देण्यासाठी आमदार अधिकाऱ्यांसमवेत डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चौकशी करून नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
बुधवारी, सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरासह तालुक्यातील जुनोनी, कोळा, किडबिसरी, गोडवाडी, राजुरी, मेडशिंगी, डिकसळ, अचकदानी, महूद आदी गावांत मेघगर्जना, वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. काही भागात मोठमोठ्या गाराही पडल्या. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू आदी पिकांची काढणी चालू असताना मोठा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सूचना दिली असतानाही सर्व पिके आणून कोठे ठेवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. तालुक्यातील शेतकऱ्यांची वर्षाच्या रोजीरोटीचा प्रश्न या धनधान्यावर अवलंबून असतो, तोच निसर्गाने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता.
आमदार डॉ. देशमुख हे तातडीने अधिवेशनातून परत येऊन तहसीलदार बाळूताई भागवत, कृषी अधिकारी दीपाली जाधव, जिल्हा परिषद सदस्य किरण पांढरे, पंचायत समिती सदस्य अमृत पाटील, सोपान कोळेकर, सरपंच राजू पाटील आदींसमवेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
तसेच शासनाने तातडीने पंचनामे करून भरघोस मदत करावी, अशी मागणी आमदार डॉ. देशमुख
यांनी केली. विधानसभेतही प्रश्नउपस्थित करून तातडीने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
द्राक्ष, डाळिंबाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या झाडाची लागवड झालेली आहे. सध्या आंब्याच्या झाडावर लहान लहान कैऱ्या व काही ठिकाणी मोठे आंबे असून गारपिटीमुळे ते सर्व खाली गळून पडले आहेत. फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
झाल्याने फळ उत्पादक शेतकरी ऑक्सिजनवर आहे. गहू हे पीक भुईसपाट झाले असून ज्वारीचे
पीक आडवे झाले आहे. सदर नुकसानीची माहिती आमदार डॉ. देशमुख यांनी त्वरित दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिली.
चौकट
पंचनामे करण्याची मागणी सांगोला तालुक्यातील
शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपल्याने डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा, पेरू यासह इतर फळबागांचे आणि ज्वारी, मका, गहू तसेच पालेभाज्या यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके व फळबागा हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप
जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार - सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment