तिसंगी तलावातून उन्हाळ्यात दोन आवर्तने; २२ मार्चपासून पाणी सोडणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

तिसंगी तलावातून उन्हाळ्यात दोन आवर्तने; २२ मार्चपासून पाणी सोडणार

 तिसंगी तलावातून उन्हाळ्यात दोन आवर्तने; २२ मार्चपासून पाणी सोडणार



पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-   तालुक्यातील तिसंगी मध्यम प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले असून येत्या २२ मार्चपासून पहिले आवर्तन सुरू होणार आहे. यानंतर मे महिन्यात दुसरे आवर्तन देण्याचे नियोजन असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

तिसंगी तलावावर सुमारे आठ गावांतील शेतीचे सिंचन अवलंबून आहे. यंदा पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने उन्हाळ्यात पिकांना दिलासा मिळणार आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी विश्रामगृहात निरा उजवा कालवा विभागाचे अभियंते व अधिकाऱ्यांसोबत आमदार आवताडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार परिचारक देखील उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आवताडे यांनी सांगितले की, “२२ मार्चपासून पाणी सोडण्यास सुरुवात होईल. हे आवर्तन एप्रिलपर्यंत सुरू राहील. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा एक पाणी पाळी देण्यात येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा आधार मिळेल.”

दरम्यान, उजनी धरणातून सोलापूरसाठी थेट पाइपलाइनद्वारे पाणी नेले जात असल्याने भविष्यात भीमा नदीत सतत पाणी सोडणे शक्य होणार नाही. त्यामुळे पंढरपूर शहरासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजना म्हणून तिसंगी तलावाचा वापर करण्याचा विचार पुढे येत आहे. निरा नदीवरील वीर धरणाच्या पाण्याने हा तलाव भरता येऊ शकतो, तसेच निरा खोऱ्यातील पाणी पिण्यासाठीही योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी पुढील काळात ठोस योजना आखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच उजनी धरणातील पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आपण सभागृहात केल्याचेही आवताडे यांनी स्पष्ट केले.



चौकट : पंढरपूर कॉरिडॉरवर लवकरच निर्णय

पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, हायपॉवर कमिटीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पालकमंत्री स्तरावरील समितीकडून प्रस्ताव पुढे पाठविण्यात आला आहे. अर्थसंकल्पात तरतूद नसली तरी मुख्यमंत्री आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ शकतात. बाधित नागरिकांच्या संमतीनंतर जागांचे संपादन करण्याची प्रक्रिया राबवली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages