पाईपलाईन दुरुस्तीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला
सोलापूर (कटूसत्य वृत्त): शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांमधून तसेच सत्ताधारी व विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच आता आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. मुख्य पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा थांबविण्यात येणार असून त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एका रोटेशनसाठी एक दिवसाने पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जुळे सोलापूर येथील एम.बी.आर. उंचावरील टाकीवरून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन आसरा पुलालगत, कल्याणनगर परिसरात रेल्वे मार्गाजवळ नादुरुस्त झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे.
रेल्वे प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर सोमवार, दि. २३ मार्च रोजी महापालिकेमार्फत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी काही कालावधी लागणार असल्यामुळे त्या दिवशी होणारा पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात येणार असून पुढील रोटेशन एक दिवस उशिरा होणार आहे.
दरम्यान, या कामामुळे शहरातील पाणीपुरवठा पुढील काही दिवस विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment