बेलाटीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राम मंदिर भूमिपूजन; भक्त निवासाचे लोकार्पण उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

बेलाटीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राम मंदिर भूमिपूजन; भक्त निवासाचे लोकार्पण उत्साहात

 बेलाटीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राम मंदिर भूमिपूजन; भक्त निवासाचे लोकार्पण उत्साहात



उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त): उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर परिसरात राम मंदिराचे भूमिपूजन व भक्त निवास लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

नववर्ष प्रतिपदेच्या निमित्ताने अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारण्याचा मानस मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. तसेच धनगर समाजाचे आराध्य दैवत महालिंगराया मंदिराचे पुजारी व कविवर्य आडव्याप्पा महाराज वडियार (हुलजंती) यांच्या हस्ते संत सद्गुरू बाळूमामा भक्त निवासाचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने, महापालिकेचे गटनेते नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या गोशाळेचे भूमिपूजनही अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात ज्ञानसंपदा शाळेचे संस्थापक सिद्धारूढ बेडगनूर यांनी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सादर करून सांस्कृतिक रंगत वाढवली. तसेच बाल कीर्तनकार शंभूराजे महाराज गुंड यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले.

या भागातील नागरिकांना दूरवर जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्याने स्थानिक पातळीवरच धार्मिक स्थळाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच बाळूमामा मंदिराचेही दर्शन घडावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सोहळ्यासाठी पालकमंत्री, स्थानिक आमदार तसेच विविध संत-महंत आणि शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages